Ad will apear here
Next
मनोहर पर्रीकर, प्रतिभाताई पवार, पांडुरंग नाईक
गोव्याचे मुख्यमंत्रिपद भूषविलेले नेते आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा, तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार आणि चित्रपट छायालेखक पांडुरंग सातू नाईक यांचा १३ डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
...........
मनोहर पर्रीकर : 
१३ डिसेंबर १९५५ रोजी म्हापसा येथे मनोहर पर्रीकर यांचा जन्म झाला. मनोहर पर्रीकर यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात ‘आयआयटी’तून त्यांनी १९७८ साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. मनोहर प्रभू-पर्रीकर २००० ते २००५ व २०१२ ते २०१४ या कालावधीत गोवा राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर होते. पुन्हा २०१७पासून मृत्यूपर्यंत ते गोव्याच्या मुख्यमंत्रिपदावर होते. दरम्यानच्या काळात त्यांनी केंद्रात संरक्षणमंत्रिपद भूषविले.

आयआयटी पदवीधर असलेले ते पहिले मुख्यमंत्री होते. नंदन नीलेकणी हे त्यांचे आयआयटीतील वर्गमित्र. पर्रीकर यांच्याकडे गोव्याचे राजकारण आमूलाग्र बदलणारे नेते म्हणून पाहिले जाते. संघाच्या विचारधारेत वाढलेले पर्रीकर मोदींप्रमाणेच काम करायचे. आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे चोवीस तास कामात घालविणारे पर्रीकर मोदींप्रमाणेच अतिशय शिस्तीचे, वेळेचे काटेकोर नियोजन करणारे, स्वच्छ कारभार करणारे, साधी राहणी असलेले आणि मीडियापासून दूर राहणारे नेते होते. इंजिनिअर झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा कारखाना सुरू केला होता तो आता त्यांचा मुलगा सांभाळतो.

१७ मार्च २०१९ रोजी त्यांचे कर्करोगाने पणजीत निधन झाले. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ते गोव्याच्या जनतेसाठी कार्यरत होते. नाकात नळ्या घालून त्यांनी विधिमंडळात केलेले भाषण, तसेच पुलाच्या कामाची केलेली पाहणी या वेळचे फोटो व्हायरल झाले होते.

(मनोहर पर्रीकर यांच्याबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
........

प्रतिभाताई पवार : 
शरद पवार ६१ वर्षांचे झाले, तेव्हा त्यांचा वाढदिवस त्या वेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत साजरा झाला होता. त्या वेळी भाषण करताना वाजपेयींनी पवार यांच्या अनेक गुणांचे वर्णन केले होते आणि शेवटचे वाक्य ते असे म्हणाले होते, ‘सबसे बडी और महत्त्वपूर्ण बात यह है, की अनेक गुणों से मंडित पवारसाब ‘प्रतिभा’संपन्न भी है।’

शरद पवार यांच्या आई शारदाबाई पवार व वडील गोविंदराव पवार हे मुळात सत्यशोधक चळवळीतले सक्रिय कार्यकर्ते. शरद पवार यांच्या लग्नाच्या वेळी या दोघांना हवी होती ती आपल्या मुलाला अनुरूप अशी जोडीदार...!

बड्या बड्या घराण्यातले प्रस्ताव झुगारून टाकत पवार दाम्पत्याने पुण्यातील एका सर्वसामान्य घराण्यातल्या स्थळाला पसंती दिली. सदाशिव उर्फ सदू शिंदे नावाचे प्रसिद्ध क्रिकेटपटू यांची थोरली कन्या प्रतिभा शिंदे यांचं स्थळ कुणी तरी सुचवलं. पवार कुटुंब शिंदेंच्या मुलीला पाहायला आले अन् त्याना हे स्थळ पसंत पडलं. सदू शिंदे पुरोगामी विचाराचे होते व त्यांनी आपल्या मुलींवर तसे संस्कार केले होते; पण १९५५ साली अल्पशा आजाराने सदू शिंदेंचे निधन झाले अन् सदू शिंदेंच्या पत्नी निर्मलाताई शिंदे यांच्यावर चारही मुलींची जबाबदारी येऊन पडली; पण निर्मलाताईही भक्कम होत्या. त्यांचा जन्म बडोद्याचा. निर्मलाताईंचे वडील ब्रिगेडियर अरविंद राणे हे कडक शिस्तीचे भोक्ते तर होतेच; पण सयाजीराव गायकवाड यांच्यासारख्या पुरोगामी संस्थानिकाच्या राज्यात आयुष्य गेल्यामुळे तेही प्रखर परिवर्तनवादी नि पुरोगामी वृत्तीचे होते. 

निवृत्तीनंतर ब्रिगेडियर राणे पुण्यातच राहायला आले व त्यांच्या देखरेखीत शिंदे कुटुंबातल्या मुलींची जडणघडण झाली. प्रतिभाताईंनी शिक्षण आजोळी बडोद्याला, नंतर पुण्यातील भावे हायस्कूलमधून व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील एमईएस कॉलेजातून घेतले. दोन्ही कुटुंबे पुरोगामी विचाराची असल्यामुळे लग्न जुळवताना अजिबात रुसवे फुगवे झाले नाहीत; पण तरीसुद्धा मुलीची आई म्हणून निर्मलाताईंना धाकधूक होतीच. तेव्हा त्यानी हळूच शारदाबाईंकडे विचारण केली, ‘देण्या-घेण्याचं काही बोललात नाही?’ अन शारदाबाईंनी हसून म्हटलं, ‘नुसतं नेसल्या साडीवर मुलगी पाठवा. बाकीचं आम्ही बघून घेऊ.’ अन निर्मलाताईंच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं. जसं हवं होतं तसं स्थळ मिळाल्यामुळे शिंदे-राणे कुटुंब सुखावून गेलं. लग्न पक्कं झालं.

पण थोड्याच दिवसात शरद पवार एकटेच थेट पुण्यात आले व राणेंना भेटून म्हणाले, ‘मला मुलीशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे... एकांतात भेट हवी.’ राणे दोन मिनिटं गोंधळले खरे; पण स्वत:ला सावरत होकार दिला. काय बोलले असतील पवार या एकांत भेटीत? ‘पुढचं आयुष्य राष्ट्रासाठी व समाजासाठी वाहून देणार आहे. संसारासाठी फार वेळ देणार नाही, हे सगळं तर आहेच; पण त्याहीपेक्षा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मी एक राष्ट्रव्रत घेतलं आहे, ते सांगण्यासाठीच इथे आलो आहे.’ 

‘आता काय परत राहिलं यांचं राष्ट्रव्रत? आयुष्य तर म्हणे समाजासाठी वाहणार. तेव्हा आजून काय उरलं,’ म्हणत त्या पवारांकडे पाहत होत्या.
अन् पवार बोलू लागले ते काहीसं असं. ‘आपल्या देशाची परिस्थिती फार हलाखीची आहे हे समजावून सांगताना त्याचं मुख्य कारण इथली लोकसंख्या आहे. लोकसंख्या आवाक्यात आणण्यासाठी लोकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन एक किंवा दोन अपत्यांवरच थांबावे, या विचारसरणीचा मी आहे. इतरांना हा विचार सांगण्याचा व भावी पिढ्यांत तो रुजविण्याचा माझा विचार आहे; पण मी जेव्हा लोकांपुढे तो प्रस्ताव ठेवेन वा विचार मांडेन तेव्हा लोकं मला विचारतील. त्या वेळी मला तो विचार मी आधीच कृतीतून उतरविला आहे हे सांगायचे आहे. माझा आदर्श घेऊन इथला समाजही अपत्य जन्मावर नियंत्रण घालेल. यातून राष्ट्राची लोकसंख्या आटोक्यात येईल व देशाची भरभराटी होण्यास मोठी मदत होईल. पुढच्या पिढ्यामध्ये ही जागृती निर्माण करण्यासाठी मी एकच अपत्य ठेवण्याचं राष्ट्रव्रत घेतलं आहे. मग ते अपत्य मुलगा असो वा मुलगी असो, मला ते पहायचं नाहीये. पहिल्याच बाळावर आपल्याला थांबायचे आहे नि मला यात तुझी साथ हवी आहे...’ प्रतिभाताईंची अवस्था काय झाली असेल विचार करा; पण शेवटी पुरोगामी रक्त ते... पुरोगामित्वाच्याच वाटेवर जाणार. ‘चालेल...’ मनोधैर्य एकवटून प्रतिभाताईही बोलल्या अन् पवारांच्या एका अपत्याच्या राष्ट्रव्रतातील चळवळीच्या त्या पहिल्या अनुयायी ठरल्या.

एक ऑगस्ट १९६७ रोजी बारामतीच्या शाहू हायस्कूलच्या पटांगणात प्रतिभाताई व शरद पवारांचा विवाह झाला. देणे घेणे नाही, हुंडा नाही, रुसवे फुगवे नाहीत... वा मानपान नाही, असा तो साधासुधा लग्नसोहळा होता. बारामतीत त्या दिवशी प्रचंड पाऊस होता. विशेष म्हणजे विवाह समारंभाला सगळ्या पंचक्रोशीतील माणसे उपस्थित होती. आपल्या आमदाराच्या विवाहाला ते सगळे उत्साहाने आले होते.
........

पांडुरंग सातू नाईक : 
१३ डिसेंबर १८९९ रोजी पांडुरंग सातू नाईक यांचा जन्म झाला. आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक म्हणून ते ओळखले जायचे. पांडुरंग सातू नाईक ‘नवयुग’मध्ये भागीदार होते. अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने नवयुग चित्रपट कंपनी काढली. पुढे ‘हंस पिक्चर्स’मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ‘नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. ‘छाया’, ‘धर्मवीर’, ‘प्रेमवीर (१९३७)’, ‘ज्वाला (१९३८)’, ‘ब्रह्मचारी’, ‘ब्रँडीची बाटली (१९३९)’, ‘देवता’, ‘सुखाचा शोध (१९३९)’, ‘लग्न पहावं करून (१९४०)’, ‘अर्धांगी (१९४०)’, ‘पहिला पाळणा’, ‘भक्त दामाजी (१९४२)’, ‘पैसा बोलतो आहे (१९४३)’, ‘रामशास्त्री (१९४४)’, ‘लाखारानी (१९४५)’, ‘चिराग कहाँ रोशनी कहाँ’ इत्यादी अनेक चित्रपटांचे उत्कृष्ट छायालेखन त्यांनी केले. 

पांडुरंग सातू नाईक यांचे २१ ऑगस्ट १९७६ रोजी निधन झाले.

(माहिती संकलन : संजीव वेलणकर)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZRGCH
Similar Posts
शरद पवार, गोपीनाथ मुंडे, रजनीकांत, एन. दत्ता, खेमचंद प्रकाश, भरत जाधव ज्येष्ठ नेते शरद पवार, लोकनेते गोपीनाथ मुंडे, दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत, लोकप्रिय संगीतकार एन. दत्ता, खेमचंद प्रकाश आणि मराठी सुपरस्टार भरत जाधव यांचा १२ डिसेंबर हा जन्मदिन....त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय...
दि. बा. मोकाशी, गणेश मावळणकर, बप्पी लाहिरी ज्येष्ठ लेखक दि. बा. मोकाशी, पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश मावळणकर आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचा २७ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय
प्रख्यात चित्रकार सावळाराम हळदणकर, निवेदक सुधीर गाडगीळ प्रख्यात चित्रकार सावळाराम हळदणकर, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांचा २५ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा अल्प परिचय....
एस. एन. त्रिपाठी पौराणिक चित्रपट संगीताचे बादशहा म्हणून प्रसिद्ध असलेले संगीतकार एस. एन. त्रिपाठी यांचा १४ डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language